Chikkodi

काँग्रेस सरकार कोसळणार नाही; भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांचे वक्तव्य

Share

रामलिंगारेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे मत भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी व्यक्त केले आहे. चिकोडी तालुक्यातील खजगौडनट्टीमध्ये २० लाख रुपयांच्या श्री बाळूमामा मंदिर समुदाय भवनाच्या बांधकाम शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता २०२८ मधील पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणे निश्चित आहे, असे भाकीत रायबाग मतदारसंघाचे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी वर्तवले आहे. खजगौडनट्टी गावात आयोजित कार्यक्रमात त्यांनी विकासकामांचे भूमीपूजन केले.

राजकीय परिस्थितीवर बोलताना, डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी व्यक्त केला. मंत्री रामलिंगारेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे सरकारला कोणतीही अडचण येणार नाही आणि सरकार कोसळण्याची भीती नाही; मात्र या सरकारने रायबाग मतदारसंघातील भेंडवाड आणि हनुमान उपसा सिंचन योजनांना तत्काळ मंजुरी देऊन शेतकऱ्यांचे हित जपावे, अशी मागणी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी केली.

खजगौडनट्टी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी असलेल्या समुदाय भवनासाठी आमदारांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, या कामाला सुरुवात झाल्यामुळे आनंद होत असल्याची प्रतिक्रिया चंदरगी क्रीडा शाळेचे अध्यक्ष महेश भाते यांनी दिली.

या प्रसंगी विजय कोठीवाले, सदानंद घोरपडे, राजू नाईक, महेश चौडन्नवर, प्रकाश पुजारी, निंगप्पा शिंगाई, दुंडप्पा बाडकर, अण्णाप्पा पाटील, दुंडप्पा खोत, दुंडप्पा मस्ती, लक्ष्मण पुजारी आणि महेश चौगला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: