कागवाड तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा कोणताही तुटवडा भासलेला नाही. पुढील आठ आठवडे पुरेल इतका साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही, अशी माहिती तहसीलदार रवींद्र हादिमणी यांनी दिली.

सरकारी विश्रामगृहात पावसाळ्यातील पूर परिस्थिती आणि आपत्कालीन नियोजनासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली. या वेळी तहसीलदार रवींद्र हादिमणी आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली यांनी विविध विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

बैठकीत बोलताना तहसीलदार हादिमणी यांनी सांगितले की, आगामी पावसाळ्यात कृष्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या आठ गावांना पुराचा पूर्ण फटका बसण्याची शक्यता असून पाच गावांना अंशतः झळ बसू शकते. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी उपलब्ध आठ नौकांपैकी नादुरुस्त असलेल्या तीन नौका तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वादळी पावसामुळे पडू शकणाऱ्या झाडांची माहिती घेऊन वन आणि ‘हेस्कॉम’ विभागाने कारवाई करावी. तसेच गावातील मोडकळीस आलेल्या घरांचे स्थलांतर आणि आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे सांगण्यात आले.
जून महिन्यात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला रजा मंजूर केली जाणार नसून सर्वांनी मुख्यालयी राहूनच कर्तव्य बजावणे बंधनकारक असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात चोरी व बेकायदेशीर कृत्यांवर नजर ठेवण्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले.
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाते, उपतहसीलदार विजयकुमार चौगुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पलता सुन्नादकल, मुख्याधिकारी प्रसन्न कल्याणशेट्टी, के. के. गावडे, महांतेश कोल्हापूर, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मदभावी, कृषी अधिकारी निंगण्णा बिरादार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments