Kagawad

कागवाड : तरुणाच्या हत्येप्रकरणी जोडगुळीला अटक

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूरमध्ये एका तरुणाचा क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करत कागवाड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ऐनापूरमधील रहिवासी ललिता सिद्धप्पा कमते यांनी कागवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवली. मंगळवारी दुपारी दीड ते सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ऐनापूर गावच्या हद्दीतील गोविंद शंकर देवल यांच्या शेताच्या बांधावर ही घटना घडली होती. शेतात असलेल्या नारळांची विक्री करण्याच्या क्षुल्लक वादातून हा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी संतोष सिद्धप्पा कमते यांच्या डोक्यावर दगड घालून त्यांचा निर्घृण खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला.

बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर बी बसरगी आणि अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणी वर्तुळाचे सीपीआय संतोष हल्लाूर व कागवाडचे पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ऐनापूरमधील बाहुबली बाळासाहेब भोसगे आणि श्रीशैल कल्लाप्पा मडीवाळर या दोघांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Tags: