चिक्कोडीमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष दलाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चिक्कोडी आणि बेळगावमधील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून, माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सुभाष दलाल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बेळगावमधील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री एकच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या बेळकुड या मूळ गावी आणण्यात आले, जेथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दलाल हे सध्या ‘विजयवाणी’ या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून कार्यरत होते.

गेल्या ३ ते ४ दशकांपासून त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून अतिशय उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर, पत्रकार मित्रांवर आणि नातेवाइकांच्या वर्तुळावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत सुभाष दलाल यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


Recent Comments