धारवाडमध्ये स्वतंत्र महापालिकेच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. आता या आंदोलनात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उडी घेतली आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि प्रमुख आंदोलकांच्या भेटीसाठी वेळ मागत जोशी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या समोर गेल्या अनेक दिवसांपासून स्वतंत्र महापालिकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यपालांना पत्र लिहून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या पुढाकारामुळे आंदोलकांच्या लढ्याला पहिल्या टप्प्यात मोठे यश आल्याचे मानले जात आहे.

राज्य सरकारने आधीच धारवाड स्वतंत्र महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, राज्यपालांकडून या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास विलंब होत असल्याने, यामागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर या वाढत्या दबावामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला आहे.


Recent Comments