Dharwad

धारवाडमध्ये एकाच गावातील दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

Share

धारवाड जिल्ह्यातील एकाच गावातील तरुण आणि तरुणीने वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरुवातीला रील्स पाहण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचे आता समोर आले आहे.

धारवाड तालुक्यातील कोटबागी येथील २० वर्षीय मेघा कब्बन्नवर हिने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. सुरुवातीला रील्स पाहण्यावरून झालेल्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला होता. मात्र, या आत्महत्येला आता वेगळे वळण मिळाले आहे.

मेघाने विष प्राशन केल्याचे समजताच, त्याच गावातील तरुण सागर याने धारवाड येथील मित्राच्या पीजी रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मेघा आणि तरुण यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती तरुणीच्या कुटुंबाला मिळाली होती. यावरून घरात वाद झाल्याने तरुणीने विष प्राशन केले. ही बातमी समजताच दुखावलेल्या तरुणाने मित्राच्या खोलीत कोणी नसताना स्वतःचे आयुष्य संपवले. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत मृत तरुण सागरचा मित्र आणि मृत तरुणाची आई सरोजा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

तरुण आणि मेघा यांच्या प्रेमाबद्दल कुटुंबात कोणालाही कल्पना नव्हती. तरुणीच्या घरात वाद झाल्याचे समजताच धारवाडमध्ये कामाला असलेला तरुण मित्राच्या खोलीवरच थांबला होता. त्याने रात्री कुटुंबाशी संवाद साधला, मात्र सकाळी फोन उचलणे बंद केले. मुलगा फोन उचलत नसल्याने आई-वडिलांनी दुकानात जाऊन चौकशी केली. मित्राकडून पत्ता मिळवून खोलीवर जाऊन पाहिले असता तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेबाबत अधिक माहिती देताना मृत तरुणाचे वडील आणि भाऊ भावनाविवश झाले होते .

या दोघांच्या निर्णयामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणीने गरग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर तरुणाने विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: