स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेळगाव दक्षिण मतदारसंघात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य बाईक रॅली उत्साहात पार पडली.


बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने या भव्य ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शहापूर येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर होसूर बसवण गल्ली, खासबाग संभाजी रोड, नाथपै सर्कल, खडे बाजार आणि महात्मा फुले रोडमार्गे जात गोवावेस येथील जगज्योती बसवेश्वर चौकात रॅलीचा समारोप झाला.


रॅलीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात ‘हर घर तिरंगा’ अभियान सातत्याने राबवले जात आहे. यंदा दक्षिण मतदारसंघातील सुमारे २२,००० घरांवर त्रिरंगी ध्वज फडकवण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आजच्या रॅलीत ५,००० हून अधिक बाईकस्वारांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या महान हुतात्म्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.”

यावेळी भाजप महिला मोर्चा महानगर अध्यक्ष गीता सुतार यांनी बोलताना सांगितले की, तरुण पिढीमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी केवळ सरकारी कार्यालये आणि शाळा-कॉलेजांपुरता मर्यादित असलेला त्रिरंगी ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या घराघरांत पोहोचला आहे, याबद्दल त्यांनी आमदार अभय पाटील आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
या भव्य रॅलीत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.


Recent Comments