अथणीहून बेळगावला जाणाऱ्या बसचा चालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील एका चहाच्या दुकानात घुसून मोठा अपघात झाला आहे.

गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. अथणीहून बेळगावला जाणारी ही बस अनियंत्रित होऊन चहाच्या दुकानात घुसली, ज्यामध्ये दुकानाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने, बस येताना पाहून दुकानातील तीन तरुण तातडीने बाजूला पळाल्याने मोठा अनर्थ टळला.

दुकान मालक प्रशांत नलवडे यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ते केवळ नशिबाने वाचले आहेत. अपघातात दुकानातील फ्रीज आणि इतर साहित्यासह सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बस चालक संतोष हळ्ळी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “त्या क्षणी नक्की काय झाले मला काहीच समजले नाही. मला क्षणभर शुद्ध हरपल्यासारखी झाली होती आणि बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला,” असे चालक संतोष हळ्ळी यांनी सांगितले.
या अपघातात बसच्या दर्शनी भागाचा काच फुटून पूर्णपणे नुकसान झाले आहे. घटनेत तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बेळगाव-कागवाड हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने येथे मोठी वर्दळ असते. या अपघाताचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


Recent Comments