Dharwad

धारवाडमध्ये वादळी पावसाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा संताप

Share

धारवाडमध्ये गेल्या मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शहरात मोठी पडझड झाली आहे. महाकाय वृक्ष आणि विद्युत खांब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक तास उलटूनही अधिकारी फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

धारवाडमधील मेहबूब नगर आणि आनंद नगरच्या मुख्य रस्त्यावर वादळी पावसामुळे विद्युत खांब आणि एक मोठा वृक्ष रस्त्यावर आडवा कोसळला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असली तरी, बुधवारी दुपारपर्यंत हे अडथळे हटवण्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वन विभाग, हेस्कॉम किंवा महानगरपालिकेचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे वीजवाहिन्या थेट रस्त्यावर पडल्या असून, वीज पुरवठा सुरू असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने रस्ता मोकळा करावा आणि वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags: