एसएसएलसी परीक्षेत कागवाड तालुक्यातील जुगुळ येथील विद्यार्थिनी ज्योत्स्ना बालचंद्र पाटील हिने ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण गावात तिचे कौतुक होत असून ग्रामस्थांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

जुगुळमधील निवृत्त मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांची नात असलेल्या ज्योत्स्नाने विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथील ऑक्सफर्ड विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. तिने कन्नड, हिंदी, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले होते. पुनर्मूल्यांकनानंतर इंग्रजी विषयातही १०० गुण मिळाल्याने ज्योत्स्ना राज्यात दुसरी आली आहे.

शिक्षण विभाग आणि संस्थेच्या वतीने झालेल्या गौरव सोहळ्यानंतर ग्रामस्थ आणि निवृत्त शिक्षकांनी तिचे जंगी स्वागत करत अभिनंदन केले.
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि चिकाटीने केलेल्या अभ्यासामुळेच हे यश मिळाल्याचे ज्योत्स्ना पाटील हिने सांगितले. भविष्यात आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे तिचे स्वप्न असून यशाचे श्रेय तिने आपल्या गुरुजनांना आणि कुटुंबीयांना दिले आहे.
तिचे आजोबा आणि निवृत्त मुख्याध्यापक शिवगौडा शंकर पाटील यांनी देखील ज्योत्स्नाचे अभिनंदन करत तिचे कौतुक केले.
या सत्कार प्रसंगी विद्यार्थिनीचे कुटुंबीय,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments