धारवाडमधील नवलगुंद तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीचा थकीत मोबदला न दिल्याने न्यायालयाने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज कार्यालयातील टेबल आणि खुर्च्यांची जप्ती केली आहे.


नवलगुंद तालुक्यातील कोंडिकोप्प येथील शेतकरी नागनगौडा पाटील यांची दोन एकर शेतजमीन २०१० मध्ये स्मशानभूमीसाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीसाठी एकूण ३५ लाख रुपये भरपाई निश्चित झाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने केवळ २० लाख रुपये देऊन उर्वरित १५ लाख रुपये गेल्या अनेक वर्षांपासून थकवले होते.
प्रशासनाने अनेक वर्षांपासून शेतकरी नागनगौडा पाटील यांचा मोबदला थकवला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार केलेल्या विनंतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला न्यायालयाकडून हा जप्तीचा आदेश मिळवावा लागला आणि आज ही कारवाई पार पडली, अशी प्रतिक्रिया वकील महादेवी यांनी दिली.
प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी नागनगौडा पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धारवाडच्या द्वितीय अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या कारवाईमुळे महसूल विभागाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments