कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या उगार खुर्द येथील आराध्य दैवत श्री लक्ष्मी देवी आणि लगमव्वा देवीचा वार्षिक यात्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी भक्तिमय वातावरणात सुरू झाला.


शनिवारी पहाटे मंदिराचे पुजारी राजू गुरव यांनी देवीला विधिवत अभिषेक केला. त्यानंतर मंदिरापासून निघालेली भव्य पालखी मिरवणूक मुख्य मार्गावरून कृष्णा नदीकडे मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी केलेल्या ‘चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते. नदीकाठी विशेष पूजा करून पालखी पुन्हा मंदिरात आणल्यावर महापूजेने यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली.
याप्रसंगी कागवाड पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. बीरप्पा पुजारी यांनी नदीकाठी पालखीचे पूजन केले. या सोहळ्यात दीपक पाटील, बसू सांगावे, बाळासाहेब विसापुरे, रोहन नाईक, नगरपालिकेचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार राजू कागे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दादूबा थुरुशे यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले.
रविवारी यात्रेच्या मुख्य दिवशी देवीला पंचामृत अभिषेक आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. नवस पूर्ण करण्यासाठी अनेक भाविकांनी दंडवत घालून आपली श्रद्धा व्यक्त केली. शहरातील प्रत्येक घरात पारंपारिक नैवेद्य दाखवून सण साजरा करण्यात आला. या सोहळ्यामुळे संपूर्ण उगार खुर्द परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.


Recent Comments