Kagawad

कागवाडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरात गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथील एका शेतकऱ्याच्या घरासमोरील ३० वर्ष जुने झाड कोसळून खाली दबल्याने सुमारे २ लाख रुपये किमतीच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

शेडबाळ येथील महावीर बापू समाज यांच्या घरासमोर हे झाड उन्मळून पडले. झाडाखाली तीन म्हशी बांधल्या होत्या, त्यापैकी एका म्हशीवर झाडाचा मुख्य भाग पडल्याने तिचा अंत झाला. या घटनेमुळे महावीर समाज आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली असून अत्यंत जड अंतःकरणाने म्हशीवर अंतिम सोपस्कार पूर्ण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शेडबाळचे ग्रामलेखापाल के. पी. बडिगेर, पशुवैद्यकीय अधिकारी तात्यासाहेब पाटील, राजू अळमल्ली आणि नगरपंचायत सदस्य बाबू आयनापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीचा अहवाल कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादीमनी यांना सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐन संकटाच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी, अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे.

Tags: