Kittur

कित्तूरमधील ऐतिहासिक रणगट्टी तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू

Share

कित्तूरमधील बऱ्याच काळापासून दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक रणगट्टी तलावाला अखेर संजीवनी मिळाली आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उपसा सिंचन योजनेंतर्गत तलावात पाणी भरण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आज अधिकृत प्रारंभ करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील ऐतिहासिक रणगट्टी तलाव गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, मात्र तलावाची स्थिती सुधारली नव्हती. स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन, आता दोन कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या कामामुळे तलावाची स्वच्छता आणि पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटणार आहे.

तलाव भरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. कुळ्ळोळ्ळी ग्रामपंचायत व्याप्तीमधील नागरिक आणि पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी ओढ्यावर छोटा पूलही बांधण्यात येणार आहे. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय अनुभवामुळे सरकारकडून निधी मिळवणे सोपे झाले असून मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अनुभवी कंत्राटदार विठ्ठल सिद्धप्पा कोळी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Tags: