बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सुतगट्टी येथे ‘आयुष्मान आरोग्य केंद्रा’चे भूमिपूजन करण्यात आले. तसेच नेसरगी गावात लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने १६० लाख रुपये खर्चाच्या नवीन बंधाऱ्याच्या कामाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

कित्तूर मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे. नेसरगी भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील शेतजमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

सुतगट्टी गावात उभारण्यात येणाऱ्या ‘आयुष्मान आरोग्य केंद्रा’मुळे स्थानिक ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत. दीर्घकाळाची मागणी पूर्ण झाल्याबद्दल सुतगट्टी आणि नेसरगी भागातील नागरिक तसेच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.




Recent Comments