Kittur

वायव्य परिवहन महामंडळाचे नामांतर होणार : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आयोजित कित्तूर उत्सव कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी वायव्य कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाचे नाव बदलून ‘कित्तूर राणी चन्नम्मा वाहतूक महामंडळ’ करणार असल्याची घोषणा केली.

कित्तूर उत्सवात बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या भागाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला. कित्तूरचा किल्ला पर्यटनाचे प्रमुख केंद्र व्हावे, या स्थानिक आमदारांच्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने विविध विकासकामांची घोषणा केली. यासोबतच चन्नम्मा फ्रीडम पार्कच्या उभारणीसाठी आगामी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असे स्पष्ट केले.

या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या भागातील शेतकऱ्यांसाठी ५२० कोटी रुपयांची उपसा सिंचन योजना आखली जात आहे. याशिवाय १०० खाटांचे रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभागाची ३०० कोटींची कामे आणि इतर प्रकल्पांसह कित्तूरमध्ये सुमारे १ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येत आहेत.

राणी चन्नम्मा यांच्या त्यागाचे स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, चन्नम्मा हे केवळ नाव नसून ते स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे. राणी चन्नम्मा यांचे साहस आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा इतिहास प्रत्येक पिढीला स्वाभिमानाचा धडा शिकवतो.

राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती आणि अन्नभाग्य यांसारख्या योजनांद्वारे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत आहे. बसवेश्वरांच्या समतेच्या संदेशावर चालत हे सरकार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

Tags: