बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावात रिक्षाचा नंबर लावण्यावरून झालेल्या वादातून अशोक वड्डर या रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी बनाव रचणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करून हिंडलगा कारागृहात धाडले आहे.


मंगसुळी गावात रिक्षेच्या स्टँडवर रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून भाऊबंदकीतील जुना वाद पुन्हा उफाळून आला. संशयित आरोपी सागर संभाजी वड्डर, शिवा संभाजी वड्डर आणि विनोद संभाजी वड्डर यांनी अशोक वड्डर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ‘तिथे भांडण सुरू आहे’ अशी खोटी माहिती दिली होती.

मृत अशोक यांच्या नातेवाईकांपेक्षा आधीच आरोपी तक्रार देण्यासाठी पोहोचल्याने पोलिसांना संशय आला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
रिक्षेचा नंबर लावण्यासारख्या शुल्लक कारणावरून तरुण रिक्षाचालकाचा बळी गेल्याने कागवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करून आरोपींना जेरबंद केले.
या तपासात सहभागी असलेल्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस अधिक्षक के रामराजन यांनी विशेष कौतुक केले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास कागवाड पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.


Recent Comments