दावणगेरेमध्ये काँग्रेस आमदार प्रदीप ईश्वर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांना दिलेली आव्हाने आणि प्रतिआव्हाने यांमुळे राजकीय वातावरण तापले असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला.
काँग्रेस उमेदवार समर्थ शामनूर यांच्या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आमदार प्रदीप ईश्वर यांनी भाजप नेत्यांविरुद्ध शड्डू ठोकला होता. याला उत्तर देताना भाजप नेते बी. जी. अजय कुमार यांनी ईश्वर यांना दावणगेरेत येण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारून प्रदीप ईश्वर आज दावणगेरेत दाखल झाले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी झाडू आणि जोडे दाखवून ईश्वर यांचा निषेध केला, तर प्रदीप ईश्वर यांनी गाडीवर उभे राहून काँग्रेसचा झेंडा फडकवत आपले शक्तिप्रदर्शन केले.
या गोंधळादरम्यान एएसपी परमेश्वर हेगडे आणि त्यांच्या पथकाने भाजप कार्यकर्त्यांना बाजूला सारून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावेळी बोलताना प्रदीप ईश्वर यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजप नेते अल्पसंख्याकांबद्दल खालच्या पातळीवर बोलत आहेत. हिजाब, हलाल आणि बजेटच्या मुद्द्यावरून त्यांनी विशिष्ट समाजाला लक्ष्य केले आहे. मी एक ओबीसी तरुण असून मला जोडे दाखवणे म्हणजे संपूर्ण ‘अहिंदा’ (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) समाजाचा अपमान आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“मला दावणगेरेला येण्याचे आव्हान दिले होते, मी भाजप कार्यालयासमोर येऊन दाखवले, मात्र ते काहीही करू शकले नाहीत,” अशा शब्दांत ईश्वर यांनी भाजपला टोला लगावला. दावणगेरे दक्षिण मतदारसंघात अहिंदा समाजाची ताकद दाखवून समर्थ शामनूर यांना विजयी करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या राड्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments