दावणगेरे जिल्ह्यातील हरीहर तालुक्यात कौटुंबिक वादातून पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या घरगुती भांडणाला कंटाळून हा प्रकार घडला असून, हरीहर ग्रामीण पोलिसांनी आरोपी आई आणि मुलाला अटक केली आहे.


हरीहर तालुक्यातील चिकबिदरी गावात जमिनीत काम करणारे शिवप्पा (४२) यांची २३ जून रोजी हत्या झाली होती. तपासादरम्यान त्यांची पत्नी सावित्री (४०) आणि मुलगा हनुमेगौडा (२०) यांनीच हा गुन्हा केल्याचे समोर आले. पती शिवप्पा हा रोज दारू पिऊन घरात भांडण करत असल्याने संतप्त सावित्रीने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

घटनेच्या वेळी मुलगा हनुमेगौडा घटनास्थळी नव्हता, मात्र त्याने नंतर आईला वडिलांचा रक्तबंबाळ मृतदेह घराच्या पाठीमागे नेऊन लपवण्यास मदत केली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने हरीहर ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून या दोन्ही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Recent Comments