दावणगेरे जवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर रात्रभर वेदनेने तळमळणाऱ्या बिबट्याला तातडीने हलवण्याऐवजी वनविभागाचे कर्मचारी निष्क्रिय राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दावणगेरे तालुक्यातील आनगोडू जवळील राष्ट्रीय महामार्ग ४८ वर रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेला बिबट्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडला होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी बिबट्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी वेळ काढूपणा केला.

वनविभागाकडे तातडीच्या बचावकार्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची हतबलता उघड झाली. होसपेठ येथून वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी येईपर्यंत बिबट्याला गंभीर अवस्थेत ताटकळत राहावे लागले. वनविभागाच्या या ढिसाळ कारभारावर आणि दुर्लक्षावर स्थानिक नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Recent Comments