Kagawad

कौलगुड्डमधील आगीचे रहस्य उलगडले; भानामती केवळ अफवा

Share

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील कौलगुड्ड गावात आपोआप आग लागण्याच्या घटनांमुळे घबराट पसरली होती. ही भानामती किंवा करणी-बाधा असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असतानाच, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते हुलिकल नटराज यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत यामागे मानवी कृत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

कागवाड तालुक्यातील कौलगुड्ड येथील ईश्वर तेग्गी यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून कपडे, धान्य आणि गुरांच्या चाऱ्याला अचानक आग लागण्याचे प्रकार घडत होते. या विचित्र घटनांमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते आणि ही कोणतीतरी अघोरी विद्या असावी, अशी भीती त्यांना वाटत होती.

या प्रकरणाची दखल घेत हुलिकल नटराज यांनी स्पष्ट केले की, अशा घटनांमागे कोणतेही दैवी किंवा आसुरी सामर्थ्य नसून केवळ विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचा हात असतो. मी स्वतः या घराला भेट देऊन यामागचे सत्य उघड करेन आणि लोकांच्या मनातील भीती दूर करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

“देव कधीही माणसाचे वाईट करत नाही आणि जे वाईट करते ते दैवत असूच शकत नाही. त्यामुळे मांत्रिक किंवा भोंदू बाबांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. हा कोणताही चमत्कार किंवा जादूटोणा नसून यामागे वैज्ञानिक कारणे किंवा मानवी खोडसाळपणा आहे,” अशा शब्दांत हुलिकल नटराज यांनी नाराजी व्यक्त केली.

अशा प्रकारची घटना पुन्हा घडल्यास मला तत्काळ व्हिडिओ कॉल करा, मी त्याचे थेट उत्तर देईन आणि यामागील सत्य जगासमोर आणिन, असा विश्वास हुलिकल नटराज यांनी व्यक्त केला आहे.

Tags: