Kagawad

शिरगुप्पीमध्ये ‘सहकाररत्न’ जिन्नप्पा चौगुले यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिर

Share

रक्तदान हे महादान असून यामुळे एखाद्याचे प्राण वाचवण्यासोबतच रक्तदात्याच्या आरोग्यालाही फायदा होतो. समाजातील प्रत्येक सुदृढ व्यक्तीने नियमित रक्तदान करून या पवित्र कार्यात सहभाग नोंदवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चिक्कोडी येथील दिया हॉस्पिटलचे डॉ. संजय पाटील यांनी केले.

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि ‘सहकाररत्न’ जिन्नप्पा चौगुले यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिक्कोडी येथील आदर्श ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात शिरगुप्पी ग्रामस्थ आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

यावेळी संस्थेचे सीईओ विद्यासागर चौगुले यांनी जिन्नप्पा चौगुले यांच्या कार्याचे स्मरण केले. “बँकेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जिन्नप्पा चौगुले यांनी सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिर घेतले जाते. संकलित झालेले रक्त सीमेवरील जखमी सैनिक आणि गरजू रुग्णांच्या उपयोगासाठी पाठवले जाणार आहे,” असे विद्यासागर चौगुले यांनी सांगितले.

या शिबिरात डॉ. सुधीर पाटील, डॉ. संध्या पाटील आणि डॉ. महाधवल भोमाज यांच्यासह परिसरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून युवकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष भम्मण्णा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात एकूण १०८ युवकांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Tags: