कागवाड तालुक्यातील श्री क्षेत्र मंगसुळी येथील प्रसिद्ध मार्तंड भैरव (मल्लय्या) मंदिरात तब्बल २३६ वर्षांनंतर नवीन कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे. सुमारे १,२२८ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरात शुक्रवारी वाजतगाजत नवीन कळसाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.


स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरात कळस बसवण्यात आला होता, त्याला आता २३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. जुना कळस जीर्ण झाल्याने मंदिराचे विश्वस्त देसाई परिवार आणि भाविकांनी नवीन कळस बसवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी मंगसुळी गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उज्ज्वलसिंग पवार देसाई, विक्रांतसिंग पवार देसाई, दिग्विजयसिंग पवार देसाई, मयूर देसाई आणि देसाई कुटुंबासह शेकडो महिलांनी सहभाग घेतला.

संकेश्वर करवीर पीठाचे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य अभिनव श्री सच्चिदानंद विद्यानृसिंह भारती स्वामीजींच्या सानिध्यात धार्मिक विधी पार पाडले गेले. मंड्या जिल्ह्यातील मुनिस्वामी भूतयनहूसूर येथे हा १५ किलो वजनाचा आणि साडेचार फूट उंचीचा पंचधातूचा कळस तयार करण्यात आला असून, त्यावर २० ग्रॅम सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे, अशी माहिती मंदिराचे प्रमुख विक्रांतसिंग देसाई आणि दिग्विजय देसाई यांनी दिली.
या सोहळ्यानिमित्त शनिवारी मंदिरात स्वामीजींच्या उपस्थितीत होम-हवन आणि धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर रविवारी सकाळी कळसारोहण होणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे. “भगवान शिव मार्तंड भैरवाच्या रूपात येथे प्रगट झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राष्ट्रकूट, चालुक्य आणि मराठा साम्राज्याने या मंदिराला राजाश्रय दिला होता,” असे स्वामीजी आणि रघुनाथ शास्त्री देसिंगकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिरात माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. आता २३६ वर्षांनंतर होणाऱ्या या कळसारोहण सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी मंगसुळीमध्ये दाखल होत आहेत.


Recent Comments