कुडचीचे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस पी. राजीव यांनी आपण कुडची मतदारसंघ सोडून इतरत्र कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून वावड्या उठवल्या जात असल्याचे सांगत त्यांनी कुडची हीच आपली कर्मभूमी असल्याचे प्रतिपादन केले.


रौबाग तालुक्यातील कुडची मतदारसंघातील गुंडवाड गावात दलित समाजातील तरुणांच्या भाजप प्रवेशावेळी पी. राजीव बोलत होते. गेल्या वेळीप्रमाणेच यावेळीही पी. राजीव हे निवडणूक लढवण्यासाठी दुसऱ्या मतदारसंघात जाणार आहेत, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कुडचीमधूनच केली असून, येथूनच निवडणूक लढवणार आहे, असे पी. राजीव यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस सरकारने ‘एससीपी’ आणि ‘टीएसपी’ योजनेचा निधी गॅरंटी योजनांसाठी वळवून अनुसूचित जाती-जमातीची फसवणूक केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून ग्रामपंचायतींमध्ये कोणतीही विकासकामे होत नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता सरकारला धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सरकारने रखडलेल्या निवडणुका त्वरित जाहीर कराव्यात, अशी मागणीही पी. राजीव यांनी केली.
या कार्यक्रमात सुमारे ६० हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी मंडल अध्यक्ष श्रीधर मुडलगी, मलगौडा पाटील, धरेप्पा कांबळे, श्रीमंत गस्ती, सुभाष कांबळे, नेमनाथ पाटील, राजेंद्र गस्ती, शिवराज कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments