Kagawad

कागवाडमध्ये वीर महिला मंडळाकडून जागतिक महिला दिन उत्साहात

Share

“महिलांचे सक्षमीकरण हाच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. महिला समर्थ झाल्या तर कुटुंब आणि समाज आपोआपच शक्तिशाली होतो,” या संदेशासह कागवाड येथील वीर महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमांतर्गत वीर महिला मंडळ गेल्या २१ वर्षांपासून कागवाडमध्ये विविध उपक्रम राबवत आहे.

यावेळी बोलताना वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा सारिका मगदूम आणि सदस्या उज्वला करव यांनी सांगितले की, “गेल्या २१ वर्षांपासून आमचे मंडळ विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहे. महिलांच्या समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि युवतींना नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणे हे आमचे मुख्य उद्देश आहेत.”

या कार्यक्रमात होम मिनिस्टर तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे भवानी ज्वेलर्स, अभिरुची हॉटेल आणि चौगुले किराणा स्टोअर्स यांच्या सहयोगातून आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेअंतर्गत विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रज्योत उपाध्ये यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले दिव्या चौगुले, प्रज्ञा चौगुले आणि पांचाली किनिंगे या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.

याप्रसंगी मिरज येथील ख्यातनाम डॉक्टर कविता मगदूम, कागवाड युवती महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा जयश्री पटवर्धन, फेडरल बँकेच्या व्यवस्थापिका अर्चना देशपांडे, अल्का मोळे आणि कागवाड जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. तात्यासाहेब धोतरे आदींसह नमिता करव, अरुणा करव, प्रिया आयनापुरे, कविता मगदूम यांच्यासह वीर महिला मंडळाच्या सर्व सदस्या आणि जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Tags: