साखर कारखाने आणि राज्य सरकारने साखर उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घेतल्यास साखर उद्योगाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन शिरगुप्पी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमेश दोड्डण्णाावर यांनी केले.


कागवाड येथील शिरगुप्पी साखर कारखान्याचा १३ वा गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. या चालू हंगामात कारखान्याने केवळ ११६ दिवसांच्या कालावधीत ८ लाख ९ हजार टन ऊसाचे यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांनी वेळेत ऊस पुरवठा केला आणि कामगारांनी कोणतीही अडचण येऊ न देता प्रामाणिकपणे श्रम घेतल्यामुळेच हा हंगाम यशस्वी झाला, अशी भावना कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगिण्णाणावर यांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अरुण फरांडे यांनी माहिती दिली की, चालू हंगामात शेजारील महाराष्ट्र आणि इतर अनेक कारखान्यांच्या तुलनेत शिरगुप्पी कारखान्याने अधिक दिवस गाळप सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील कारखाने बंद झाल्यानंतरही या कारखान्याने ऊस गाळप सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
या सोहळ्यात ऊस तोडणी मजूर, वाहन मालक आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कारखान्याचे मुख्य अधिकारी वीरेंद्र जाडर, लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष शीतल मगिण्णाणावर, सतीश मगिण्णाणावर, सागर मंगसुळे, महावीर बिर्नाळे, प्रदीप मगिण्णाणावर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments