राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून महागाई हीच काँग्रेसची सहावी गॅरंटी असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली आहे.

चिक्कोडी येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चिक्कोडीत पत्रकारांशी बोलताना बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर तीव्र असंतोष व्यक्त केला. यशाच्या गप्पा मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेचा शाप लागत आहे. पेट्रोल, डिझेल, वीज आणि मुद्रांक शुल्कात वाढ करून सरकारने जनतेला महागाईची सहावी गॅरंटी दिली आहे. दरवाढ केल्याशिवाय राज्य चालवणे सरकारला अशक्य झाले असून गॅरंटी योजनांमुळे राज्याचा विकास पूर्णपणे खुंटला आहे, असे बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले.
यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर बोलताना विजयेंद्र यांनी खळबळजनक दावा केला. स्वतःच्याच पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांना परदेश दौऱ्यावर पाठवण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे. तसेच सध्या चर्चेत असलेल्या केपीसी घोटाळ्याचा मुद्दा आगामी अधिवेशनात लावून धरला जाईल आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला.


Recent Comments