एसएसएलसी परीक्षेत सलग तीनवेळा राज्यात अव्वल ठरलेल्या चिकोडी जिल्ह्याचा दबदबा कायम राखण्यासाठी शिक्षण विभाग सक्रिय झाला आहे. जिल्ह्याचा निकाल पुन्हा एकदा राज्यात पहिला लागावा या जिद्दीने डीडीपीआय सीतारामू स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.


चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ६२१ शाळांमधील ४७,५४० विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. सर्व शाळांमधील निकाल १०० टक्के लागावा आणि चिकोडीने राज्यात पुन्हा अव्वल स्थान पटकावावे, असा विश्वास उपसंचालक सीतारामू यांनी व्यक्त केला आहे.

या मोहिमेसाठी सीतारामू कार्यालयीन कामकाज आटोपून दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विविध गावांना भेटी देत आहेत. त्यांनी सडलगा, अंकली यांसारख्या गावांमध्ये पालकांशी संवाद साधला असून, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी रात्री विशेष मार्गदर्शन वर्ग घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
उपसंचालकांच्या आवाहनानुसार आता सर्व शिक्षणाधिकारी देखील विद्यार्थ्यांच्या घरी जात आहेत. केवळ शिक्षण विभागच नव्हे, तर तहसीलदार राजेश बुर्ली आणि उपविभागीय अधिकारी सुभाष संपागावी यांनीही विद्यार्थ्यांच्या घरांना आणि वसतिगृहांना भेटी देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यास सुरुवात केली आहे.


Recent Comments