केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कागवाड शहरात ‘सीआयटीयू’ संघटनेने भव्य निदर्शने केली.
कागवाड येथील राणी चन्नम्मा चौकापासून आंदोलकांनी रॅली काढली. सुमारे ५०० हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर काही वेळ तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला.
यावेळी ‘सीआयटीयू’च्या तालुकाध्यक्षा सुवर्णा कमतगी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले. हुबळीमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान मंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन दिल्लीला जाण्यासाठी विमान तिकीट बुक करून दिले, मात्र प्रत्यक्ष कामात काहीच प्रगती झाली नाही. ही कामगारांची फसवणूक असल्याची भावना सुवर्णा कमतगी यांनी व्यक्त केली.
आंदोलकांकडून कामगार संहिता रद्द करणे, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना ईएसआय आणि पीएफ सुविधा लागू करणे तसेच एफआरएस प्रणाली रद्द करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी आशा कार्यकर्त्यांच्या नेत्या रूपा चराटे, शांता हिरेमठ आणि प्रेमा हुलवान यांनीही आपले गाऱ्हाणे मांडले. विशेष म्हणजे, बीएलओ कामातून आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना मुक्त केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभारही मानले.
तहसीलदार रवींद्र हादीमणी, ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाती आणि सीडीपीओ रवींद्र गुदुगेनवर यांनी आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारले. आपल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन तहसीलदार रवींद्र हादीमणी यांनी दिले.
या आंदोलनात सुवर्णा कमतगी, श्वेता कांबळे, निर्मला माळी, कविता सलगर, सरस्वती पवार, रूपाली वड्डर, महादेवी पाटील यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसह १० हून अधिक कामगार संघटनांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला.


Recent Comments