चिक्कोडी शहरातील श्री महादेव त्रिलिंग मंदिराचा नूतन रथोत्सव आणि कळस मिरवणूक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी, हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, चिक्कोडीचे संपदना महास्वामीजी आणि कब्बूर मठाचे श्री रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा सोहळा पार पडला. चिक्कोडी बसस्थानकापासून महादेव मंदिरापर्यंत आरती, कुंभ आणि वाद्यांच्या गजरात रथाची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी बोलताना श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, “चिक्कोडीच्या या महादेव मंदिरात तीन लिंगे असणे हे विशेष आहे. मानवी शरीर हे देवाने निर्माण केलेले मंदिर असून प्रत्येकाने धर्माचे आचरण केले तरच महादेव प्रसन्न होतो. आपण इतरांना सुख दिले तरच आपल्याला पुण्य मिळते.”

कब्बूर मठाचे श्री रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, “या मंदिराद्वारे धार्मिक संस्कृती जोपासण्याचे काम होत असून भक्तीमुळेच मानवी जीवन अर्थपूर्ण होते.” तसेच चिक्कोडीच्या संपदना स्वामीजींनी ‘धर्माचे रक्षण करणाऱ्यांचे रक्षण संकटाच्या वेळी धर्मच करतो’, असा मोलाचा संदेश दिला.

या सोहळ्याला नगराध्यक्षा वीणा कवटगीमठ, जगदीश कवटगीमठ, प्रकाश हुक्केरी यांसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


Recent Comments