Kagawad

उगारमध्ये चोरट्यांचा हातसाफ; घराचे कुलूप तोडून ३० लाखांचे दागिने लंपास

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द शहरात भीषण चोरीची घटना घडली आहे. मुलाच्या उपचारासाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल १८ तोळे सोने, चांदी आणि रोख रक्कम लंपास केली आहे.

कागवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उगार खुर्द येथील रहिवासी जिन्नप्पा श्रीपाल माक्कन्नावर यांच्या घरात ही चोरी झाली. मुलाच्या उपचारासाठी कुटुंब निपाणीला गेले असताना चोरट्यांनी डल्ला मारला. घरातून १८ तोळे सोन्याचे दागिने, ३५० ग्रॅम चांदी आणि २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

रुग्णालयात डॉक्टरांना भेटण्यास उशीर झाल्यामुळे जिन्नप्पा त्या रात्री निपाणीतच थांबले होते. बंगळुरूहून आलेला त्यांचा मुलगा राहुल सकाळी घरी पोहोचला असता त्याला घराचे कुलूप तुटलेले आढळले. आत जाऊन पाहिले असता कपाटातील दागिने गायब होते. या घटनेमुळे जिन्नप्पा यांच्या पत्नी प्रेमा माक्कन्नावर आणि मुलगा राहुल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच कागवाडचे पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगावहून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून तपासाला वेग आला आहे.

Tags: