Kagawad

अन्यायग्रस्त महिलांच्या अंधकारमय जीवनात ‘बालक महिला मंडळ’ ठरतेय दीपस्तंभ

Share

समाजात सेवाकार्य करताना टीकेची पर्वा न करता ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कवलगुडा सिद्धराम आश्रमाचे अमरेस्वर महाराज यांनी केले. उगार येथील बालक महिला मंडळाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

समाजात वावरताना अनेकजण टीका करतात, मात्र त्याने डगमगून न जाता कार्य सुरू ठेवावे. गेल्या सात वर्षांपासून मुंबईतील उद्योजक शंकर कटगेरी आणि त्यांच्या पत्नी वासंती कटगेरी यांनी या मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अन्यायग्रस्त महिला व गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या आयुष्यात संजीवनी फुंकली आहे, असे अमरेस्वर महाराज यांनी म्हटले. बुधवारी उगार नगरपालिका व्याप्तीमधील फरीदखानवाडी गावात महिला मंडळाचा सातवा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी स्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपण किती काळ जगतो यापेक्षा इतरांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे अश्रू पुसणे हेच जीवनाचे सार्थक आहे आणि बालक महिला मंडळ हेच कार्य करत आहे. समाजातील अशा संस्थांनी इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे यावे, अशी प्रतिक्रिया आयनापूर गुरुदेव आश्रमाचे श्री बसवेश्वर स्वामीजी यांनी दिली.

उद्योजक शंकर कटगेरी यांनी मुंबईसारख्या शहरात राहूनही आपल्या गावाची नाळ जपली आहे. त्यांच्या पत्नी वासंती कटगेरी यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ पीडित महिलांना कायदेशीर मदत आणि आवश्यक सहकार्य देऊन मोठा आधार ठरत असल्याचे वकील राहुल कटगेरी यांनी म्हटले.

या कार्यक्रमात क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. बी. मदभावी, सीडीपीओ रवींद्र गुदगेनवर, इंगळीकर महाराज यांनी अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात विशेष सहकार्य करणाऱ्या साधकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक वीरभद्र कटगेरी, पार्वती हळीजोळ, शोभा जाधव, संभाजी सावंत, मुख्याध्यापक एस. एस. मटोगी, एस. बी. सूर्यवंशी, हर्षद मास्तोडी, सुरेश दबाद, कोमल शिंदे यांच्यासह सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

Tags: