बाराव्या शतकात निजशरण अंबिगर चौडय्या यांनी आपल्या वचनांतून समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढले. त्यांनी दिलेला समतेचा संदेश आपण जीवनात आचरणात आणला, तरच त्यांची जयंती साजरी करणे सार्थ ठरेल, असे प्रतिपादन अथणीचे मरळुसिद्ध स्वामीजी यांनी केले.

बुधवारी कागवाड येथील सरकारी मुलांच्या शाळेत निजशरण अंबिगर चौडय्या यांची ९०५ वी जयंती अत्यंत भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कागवाड तालुका प्रशासन आणि अंबिगर चौडय्या उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कागवाड तालुका कोळी समाजाचे अध्यक्ष सुरेश कोळी, भगवंत तळवार, रायप्पा कोळी आणि दुंडाप्पा साळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.
कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादीमणी यांनी तहसीलदार कार्यालयात अंबिगर चौडय्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी तहसीलदार हादिमणी यांनी आंबिगर चौडय्या यांच्या कार्याची माहिती देत त्यांना अभिवादन केले.
अथणी येथील डॉ. काडय्या हिरेमठ स्वामीजी बोलताना म्हणाले, अंबिगर चौडय्या यांची शिकवण आज अंमलात आणणे गरजेचे असून समाजातील प्रत्येक घटकाने जातीभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन चालावे, असे आवाहन त्यांनी केले.
कागवाड तालुका कोळी समाजाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी प्रास्ताविक केले. गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही जयंती साजरी करत असून, तालुका प्रशासन आम्हाला मोलाचे सहकार्य करत आहे, असे त्यांनी नमूद केले.
या उत्सवाचे औचित्य साधून बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील लोककलाकारांचे विशेष संमेलन, निजशरण अंबिगर चौडय्या यांच्या वचनांवर आधारित स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी इंगळीचे ज्ञानदेव महाराज, काँग्रेस नेते विपुल पाथगौडा पाटील, महिला व बालविकास अधिकारी सुजाता पाटील, भगवंत तळवार, वीरप्पा पुजारी, संदीप कोळी, विठ्ठल गस्ती, शैलजा कोळी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments