कागवाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ते विकास आणि समाजभवन उभारणीची कामे प्राधान्याने केली जातील, अशी माहिती आमदार राजू कागे यांनी दिली.

बुधवारी मंगसुळी येथे वन विभागामार्फत ६० लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या उद्यान संरक्षक भिंत (कंपाऊंड) कामाचा शुभारंभ आमदार कागे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघातील विकास आराखड्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “मंजूर ५० कोटी रुपयांपैकी ३६ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) आणि १३ कोटी रुपये जिल्हा पंचायत विभागामार्फत खर्च केले जातील. यातून प्रामुख्याने रस्ते सुधारणा आणि समाजभवनांची निर्मिती केली जाणार आहे.”
आमदार कागे यांनी बुधवारी सकाळी उगार येथील मुख्य रस्त्यापासून भगतसिंग चौकापर्यंत, लक्ष्मी मंदिराजवळून मंगसुळी मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्ते विकास कामाचाही प्रारंभ केला. सरकार विकासासाठी कटिबद्ध असून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उगार येथील कार्यक्रमात कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, नगरपंचायत उपाध्यक्ष सतीश जगताप, मुख्याधिकारी मंतय्या कोल्हापूर, सदस्य महादेव वडगावे, प्रफुल्ल थोरुशे, विजय हसुदे, महादेव कटगेरी, बाळू विसापुरे, संजय शिंदे, प्रदीप चिंचवाडे, दिलीप हुल्लोळी, अमर जगताप, बसू संगवे, अभियंता दस्तगीर पठाण, कंत्राटदार एम. एच. नदाफ, अल्ताफ नदाफ उपस्थित होते.
मंगसुळी येथील कार्यक्रमात वन अधिकारी राकेश अर्जुनवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कामाची माहिती दिली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळू भजंत्री, मुकुंद पुजारी, दलित नेते संजय तळवलकर, रवी मेटगुड, राकेश कुठावाडे, मीरासाब सनदी, मिलिंद वराळे, दिलीप मगदूम, सहदेव नाईक, रणजित इनामदार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments