Kagawad

कृष्णा नदीसाठी महाराष्ट्रातून पाणी सोडण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार : आम. कागे

Share

कृष्णा नदीतील सुमारे तीन टीएमसी पाणी हिप्परगी धरणाचा गेट क्रमांक २२ तुटल्यामुळे वाहून गेले आहे. यामुळे येत्या महिनाभरात नदीचे पात्र कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती गंभीर असून नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे आमदार राजू कागे यांनी म्हटले.

या संकटाची दखल घेऊन याच महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल. चिकोडी, अथणी, कागवाड आणि जमखंडी तालुक्यातील सर्व आमदारांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कोयना धरणातून कृष्णा नदीत दोन टीएमसी पाणी सोडण्यासाठीचा प्रस्ताव यावेळी सादर केला जाईल, अशी माहिती आमदार राजू कागे यांनी दिली.

मंगळवारी कवलगुड्डी गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार राजू कागे यांनी सांगितले की, हिप्परगी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान होण्याची आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र सरकारची भेट घेऊ आणि पाण्यासाठी लागणारी रक्कम भरून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करू. हिप्परगी धरणाच्या गेटमधून अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, ती थांबवण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तुम्ही इच्छुक आहात का, असे विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात काँग्रेस पक्षाचे १४० आमदार निवडून आले असून, हे सर्वच जण मंत्री होऊ शकत नाहीत. माझ्याऐवजी इतरांना संधी मिळाली तरी मला त्यात समाधान वाटेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Tags: