कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेंढ्यांच्या झुंजीच्या स्पर्धेत गोकाक तालुक्यातील मुधळगी येथील अज्जप्पा सनदी यांच्या मेंढ्याने प्रथम क्रमांक पटकावून मैदान मारले.

ग्रामीण भागातील या पारंपारिक आणि चित्तथरारक खेळाने ऐनापूर पंचक्रोशीतील नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. या स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी आणि पशुपालक एकत्र आले होते.
शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत सिद्धप्पा तेली आणि अज्जप्पा नीलजगी यांच्या मेंढ्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत लक्ष्मीदेवी बॅकोड यांच्या माध्यमातून सहा निवडक मेंढ्यांनी सहभाग घेतला होता. या सोहळ्याला चिकुब्बी श्री मठाचे अभिनव श्री नागलींग महास्वामीजी आणि ऐनापूर येथील गुरुदेव आश्रमाचे बसवेश्वर महास्वामीजी यांचे पावन सान्निध्य लाभले. प्रगतशील शेतकरी गुंडू खवटकोप्प यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला तात्यासाहेब कोरबू, गोपाळ मानगावे, रामू सवदत्ती, यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादा जंतनवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मुरसिद्ध कठारे यांच्या वतीने प्रथम ७ हजार आणि द्वितीय ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची बक्षिसे रमेश नाईक यांनी प्रदान केली. यावेळी आशिर्वचन देताना नागलींग स्वामीजींनी ऐनापूर यात्रेचे महत्त्व विशद केले. ही यात्रा ऐतिहासिक असून येथे आयोजित केली जाणारी कृषी प्रदर्शने आणि विविध स्पर्धा ग्रामीण भागाचा वारसा समृद्ध करत असल्याचे त्यांनी म्हटले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटी आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments