Vijayapura

वारंवार भूकंपाच्या धक्क्याने विजापूरकर धास्तावले!

Share

विजापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे संकट वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिवाळीच्या उत्साहात असलेल्या नागरिकांना एकाच दिवसात दोन ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आठवड्याभरात पुन्हा बुधवारी मध्यरात्री भूकंपाच्या सलग धक्क्यांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

मागील तीन वर्षांपासून भूकंपाच्या मालिकेमुळे हादरलेल्या विजापूर जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा घाबरवले आहे. दिवाळीदरम्यान एकाच दिवशी विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी आणि विजापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगूळी शहर, हत्तरकीहाळ, नंद्याळ, यरनाळसह अनेक गावांमध्ये जोरदार आवाजासह भूकंपाचा अनुभव आला. भूकंपाची तीव्रता रीष्टर स्केलवर २.९ इतकी नोंदवली गेल्याने नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन महिन्यांत ११ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून पुन्हा काल रात्री भूकंपाचा अनुभव आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही भूकंपाची तीव्रता कैद झाली आहे. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भूकंप ॲप्समध्ये ३.० तीव्रता नोंदवली गेली असून सलग होत असलेल्या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीबद्दल येथील नागरिक सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करत आहेत.

यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या १६, १८ आणि २३ तारखेला भूकंपाचे धक्के जाणवले होते. विशेषतः १८ सप्टेंबरला सिंदगी शहरात एकूण चार भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तसेच, ११ आणि २२ ऑक्टोबर रोजीही विजापूर, तिकोटा, बसवनबागवाडी भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूगर्भात होणाऱ्या रासायनिक क्रिया भूकंपासाठी कारणीभूत ठरत आहेत, असे सांगितले जाते. विजापूर जिल्ह्याच्या भूगर्भात लाइम स्टोनचे थर असल्याने, अतिवृष्टीमुळे पाणी या थरांमध्ये शिरल्यावर रासायनिक अभिक्रिया होते. यामुळे भूगर्भात मोठा आवाज निर्माण होतो आणि भूकंपाचे धक्के जाणवतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भूकंपाबद्दल मंत्री एम. बी. पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

एकंदरीत, विजापूर जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून लोकांना भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या संदर्भात भूवैज्ञानिकांनी सिस्मोमीटर बसवून लोकांमध्ये असलेले भय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, हे नाकारता येणार नाही.

Tags: