वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे विजापूर शहराचे नागरिक भयभीत झाले आहेत. विजापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवले आहे. आलमट्टी जलाशय पूर्ण भरल्यामुळेच हे धक्के बसत आहेत का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून विजापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगूळी येथे परवा रात्री उशिरा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे मनगूळी शहर आणि आजूबाजूच्या यरनाळ, हत्तरकिहाळ, नंद्याळ या गावांच्या परिसरात कंपनाचा अनुभव आला. रिश्टर स्केलवर याची नोंद झाली असून, २.५ किलोमीटर भूगर्भात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मनगूळी शहरात भूगर्भातून तीन वेळा मोठा आवाज आला. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केलवर नोंदवली गेल्याची माहिती कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिली आहे. या भूकंपांमुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर धावले. वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. येथील स्थानिक नागरिक अरविंद कुलकर्णी यांनी याबद्दल दिलेली प्रतिक्रिया पाहुयात…
वारंवार होणाऱ्या भूकंपामागे आलमट्टीचे लाल बहादूर शास्त्री धरण पूर्ण भरलेले असणे, हे कारण असल्याचे बोलले जात आहे. २०२१ मध्ये जेव्हा विजापूर मध्ये भूकंप झाला होता, तेव्हा हैद्राबादच्या राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे रमेश दिक्पाल यांच्या नेतृत्वाखालील भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पथकाने कोलहार तालुक्यातील मसूती गावाला भेट देऊन पाहणी केली होती. विजापूर जिल्ह्यामध्ये वारंवार भूकंप होण्याचे कारण भूगर्भातील शिलास्तरांमध्ये भेगा पडल्यामुळे होणारी नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगून त्यांनी भूमापक बसवले. मात्र, भूकंपाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
विजापूर शहर, तसेच कोलहार तालुक्यातील मसूती, बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगूळी, मुळवाड, विजापूर तालुक्यातील उक्कली, तकोटा तालुक्यातील बिझ्जरगी, विजापूर जवळच्या अलियाबाद, निंगनाळ, बरटगी अशा अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काल रात्री ९.२० च्या सुमारास जोरदार आवाजासह भूकंपाचा अनुभव आला. विजापूर शहरातील शिवगिरी, पानी नगर, बायपास, महल ऐनापूर या भागात कंपनाचा अनुभव आला. वारंवार होणाऱ्या भूकंपाबद्दल प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, तसेच जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आणि आलमट्टी येथील पूल असल्याने, त्यांना हानी पोहोचल्यास काय, याबद्दल जिल्हा प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते संगमेश सागर काय म्हणाले, पाहुयात..
एकूणच, विजापूर मध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, यावर वैज्ञानिक अभ्यास होण्याची गरज आहे. आलमट्टीचे लाल बहादूर शास्त्री धरण भरल्यावर भूकंपाचे धक्के वारंवार बसत असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल सरकार आणि जिल्हा प्रशासनाने जनतेला योग्य माहिती देऊन जागरूक करण्याची गरज आहे.


Recent Comments