बागलकोट जिल्ह्याील हुनगुंद आणि इळकल तालुक्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून, या धंद्याला स्थानिक आमदार, खाण विभाग तसेच तहसीलदार स्तरावरील अधिकारी साथ देत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

वाळू उत्खननाच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यावरही अवैध उपसा सुरू असल्याचे प्रश्न विचारणाऱ्या शेतकरी आणि तक्रारदारांना धमकावून वाळू माफिया आपला हैदोस सुरूच ठेवत आहेत.
८ सप्टेंबर रोजी खाण आणि भूविज्ञान विभागाच्या कार्यालयाजवळच एस. बी. पाटील नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर तक्रारदारांनी आमदार विजय आनंद काशप्पनवर यांच्यावर थेट वाळू धंद्यात सहभागी असल्याचा आरोप केला असून, “आमदार आणि अधिकारी वाळू माफियांचे हस्तक बनले आहेत का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
हल्ला झालेले तक्रारदार एस. बी. पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर एस.पी. कार्यालयाचे दार ठोठावले आहे. यासोबतच, अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी विविध शेतकरी आणि नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, एस.पी. आणि खाण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. वाळू धंद्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला असून, अधिकाऱ्यांनीच वाळू माफियांना बोलावून हल्ला करवून घेतल्याचाही आरोप आहे. वाळू उत्खनन थांबवण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार निंगप्पा बिरादार यांनी अस्पष्ट उत्तर देऊन उदासीनता दाखवली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


Recent Comments