Bagalkot

बागलकोट जिल्ह्यातील मेटगुड तलाव पडला कोरडा

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात प्रशासकीय दुर्लक्ष आणि अशास्त्रीय कामांमुळे ७५ एकर क्षेत्रातील मेटगुड तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

मुधोळ तालुक्यातील मेटगुड गावात ७५ एकर परिसरात पसरलेला हा मोठा तलाव आज अस्तित्वात असूनही नसल्यासारखा झाला आहे. तलाव भरण्याच्या सरकारी योजनेचे काम अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने झाल्याचा आरोप होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही तलावात पाणी पोहोचलेले नाही. विशेष म्हणजे, पाणी नसलेल्या या कोरड्या तलावातच अधिकाऱ्यांनी बहुग्राम पेयजल योजना राबवली असून, यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

तलावात पाणी नसल्याने परिसरातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. याचा फटका बसून शेतकऱ्यांचे मुख्य साधन असलेल्या सुमारे १ हजाराहून अधिक कूपनलिका पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. कूपनलिका बंद झाल्याने उभी पिके डोळ्यांदेखत वाळून जात आहेत. शेती वाचवण्यासाठी शेतकरी आता इतर डोंगराळ भागात कूपनलिका खोदत असून, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागत आहे. शासनाने तातडीने तलावातील गाळ काढून योग्य कालव्याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने तलाव भरण्याची योजना राबवावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: