Khanapur

खानापूर तालुक्यातील कारदगा येथे १९ वर्षांनंतर रंगणार श्री महालक्ष्मी महायात्रा

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कारदगा, शिवोली आणि कारदगाहट्टी या तीन गावांची ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या महायात्रेची जोरदार पूर्वतयारी सुरू झाली आहे.

तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडणाऱ्या या ऐतिहासिक यात्रेची पूर्वतयारी बैठक आणि विकासकामांचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २०२७ मध्ये २४ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान सलग ९ दिवस हा भव्य महायात्रोत्सव पार पडणार आहे. यात्रेदरम्यान देवीचे स्थान असणाऱ्या जागेच्या नूतनीकरण कामाचा प्रारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या यात्रेला लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता आणि पोलीस बंदोबस्तासह सर्व शासकीय सुविधा पुरवण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. आमदार म्हणून नव्हे, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून या उत्सवाच्या यशासाठी काम करेन, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. विविध पंचायतींच्या हद्दीत येत असूनही तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकतेचे आणि श्रद्धचे आमदारांनी कौतुक केले.

या महत्त्वाच्या बैठकीला भाजप तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप्प, प्रमुख नेत्या धनश्री सरदेसाई, ज्योतिबा रेमानी, मल्लाप्पा मारीहाळ, सुंदर कुलकर्णी, दत्ता कदम यांच्यासह ग्रामपंचायतींचे पीडीओ, यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,.

Tags: