कर्नाटक राज्य विणकर समाज महासंघाच्या वतीने बेळगावात विणकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रतिभा पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना ‘नेकार रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध उपसमाजांना एकत्र आणणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.


अखिल भारत देवांग समाजाचे जगद्गुरू परमपूज्य श्री श्री श्री दयानंद पुरी स्वामीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमात विणकर समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी विणकर समाज हा कष्टाळू आणि स्वाभिमानी समाज असल्याचे सांगत, विविध उपसमाजांना एकत्र आणून १२५ हून अधिक विद्यार्थ्यांचा तसेच कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.


यावेळी आयोजक गजानन गुंजेरी यांनी, आज आपण केवळ गुणांचा नव्हे तर पालकांच्या त्यागाचा आणि परिश्रमाचाही सन्मान करत असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमात विचारवंत वीरेश पाटील चिक्कोडी यांनी मार्गदर्शन केले. डीसीपी नारायण भरमणी आणि ज्ञानप्पा वागूकर हे प्रमुख उपस्थित होते. देवांग, कुरुहिनशेट्टी, साकुळसाळी, पट्टसाळी, पद्मसाळी आणि नामदेव शिंपी समाजांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शंकरण्णा मुरुडी, लक्ष्मण जोगीन, भुजंग भंडारी आणि शिवराज मुरुडी यांना ‘नेकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष गजानन गुंजेरी, लोहित मोरकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो नागरिक उपस्थित होते.




Recent Comments