State

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार; १९ नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पडला पार

Share

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला असून, एकूण १९ नव्या मंत्र्यांनी अधिकृतपणे पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या सर्व नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राजधानी बंगळुरू येथील लोकभवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात १९ सदस्यांचा समावेश करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी सोहळ्यात डॉ. अजय धर्मसिंग, एच. सी. बालकृष्ण, के. एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चेलुवरायास्वामी, लक्ष्मण सवदी, मधू बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, डी. नागेंद्र, पी. एम. नरेंद्रस्वामी, पुट्टुरंग शेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगेगौडा, शिवराज संगडगी, विजयानंद काशप्पनावर आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

अनेक नेत्यांनी ईश्वर, महापुरुष, ज्येष्ठ आणि आईच्या नावाने शपथ घेतली हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. या नव्या मंत्र्यांच्या समावेशामुळे राज्य सरकारच्या प्रशासनाला अधिक गती मिळणार असून, लवकरच सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय आणखी एक मंत्रिपद प्रलंबित ठेवण्यात आले असून या मंत्रिपदावर महिला आमदाराची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags: