धारवाड जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि असंख्य खड्डे बुजविण्यास जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार करीत असलेल्या दिरंगाईविरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.

जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांच्यावर थेट निशाणा साधत कार्यकर्त्यांनी ‘गुंडी लाड’ अशा घोषणा देत आपला तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवला.
शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या एलईए कँटीन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असतानाही पालकमंत्री लाड आणि संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. ‘गुंडी लाड’ अशा घोषणा देत त्यांनी पालकमंत्री संतोष लाड आणि राज्य सरकारविरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला. काँग्रेस सरकारने सत्ता हाती घेतल्यापासून आणि विशेषतः पालकमंत्री लाड यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. यामुळे डांबरी रस्ते दिसेनासे झाले आहेत आणि सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनचालकांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दुचाकीस्वार खड्डे चुकवताना तोल जाऊन पडत असल्याचे चित्र आहे.
“पालकमंत्री संतोष लाड साहेब नेहमी मोदींच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल बोलतात, पण जिल्ह्याच्या रस्त्यांवरील खड्डे किंवा जनहिताच्या विकासावर त्यांचे लक्ष नाही. जिल्ह्याची दुरवस्था झाली असताना ते राजकारण करण्यात मग्न आहेत. प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यांकडे लक्ष द्यावे.” अशी मागणी करण्यात आली.
जर प्रशासनाने या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत, तर येत्या काळात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.


Recent Comments