Nippani

निपाणीत अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेची धडक मोहीम

Share

निपाणी शहरातील रस्ते आणि बाजारपेठांमधील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने कारवाई केली. आयुक्त गणपती पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

शहरातील कोटिवाले कॉर्नर, दलाल पेठ, चन्नम्मा सर्कल आणि चाटे मार्केट परिसरात नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी कारवाई केली. रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर ठेवलेले दुकानांचे साहित्य तसेच तात्पुरते शेड हटविण्यात आले.

काही व्यापारी दुकानातील साहित्य रस्त्यापर्यंत मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हितासाठी ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक सुरळीत करणे आणि पादचाऱ्यांना मोकळ्या जागेतून ये-जा करता यावी, हा मोहिमेचा उद्देश असल्याचे नगरपालिका सूत्रांनी सांगितले. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, शहरातील सर्व प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

Tags: