देशातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. या मागणीसाठी २९ राज्यांतील शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या लढ्याला पाठिंबा दिला आहे.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी देशभर लागू करण्यासाठी आणि शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत राष्ट्रीय हरित सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर आंदोलनाची आखणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पदयात्रेदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची त्यांच्या मूळ गावी भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यासह स्वतः आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, दिल्लीसह देशातील सर्व २९ राज्यांतील शेतकरी संघटना आणि नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून संघटित नेतृत्व उभे केले जात आहे. शेतकऱ्यांचे हक्क, न्याय आणि कल्याणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात वकील, युवक, विद्यार्थी आणि माजी सैनिकही सहभागी झाले आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत दिल्लीत सातत्याने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रेम चौगुले यांनी दिला.


Recent Comments