Khanapur

खानापूर : बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल, ३१ ऑक्टोबरला बस डेपो बंदची हाक

Share

खानापूर शहरातील जुन्या बसस्थानकापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून बससेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येत्या शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी व्यापारी संघटनेने बस डेपो बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

खानापूरमधील जांबोटी क्रॉसपासून शिवस्मारकाजवळ असलेल्या जुन्या बसस्थानकापर्यंतच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि नोकरदारांना दररोज एक ते दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. गरीब कुटुंबांना रिक्षाचे भाडे परवडत नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

ही समस्या सोडवण्याबाबत स्थानिक आमदारांनी सूचना देऊनही बस डेपो अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. विविध संघटना आणि व्यापारी संघटनांनी निवेदने देऊन आंदोलने केली, तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या या उदासीन भूमिकेचा निषेध म्हणून व्यापारी संघटनेने ३१ ऑक्टोबर रोजी बस डेपो बंद आंदोलन पुकारले आहे.

Tags: