Bellary

बळ्ळारीच्या रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

Share

बळ्ळारीच्या विजयनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात वैद्यकीय विश्वाला थक्क करणारी अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली आहे. रायचूर मधील अवघ्या दोन महिन्यांच्या बालकाच्या पोटात वाढलेले दुसरे भ्रूण यशस्वीरित्या बाहेर काढून डॉक्टरांनी त्याला नवजीवन दिले आहे.

विम्स रुग्णालयात उघडकीस आलेले हे ‘फिटस इन फिटू'(Fetus in Fetu) चे अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. सिंदनूर येथील खासगी रुग्णालयातून या बालकाला पुढील उपचारासाठी विम्समध्ये पाठवण्यात आले होते. आईच्या गर्भाशयात जुळी बालके वाढताना एक भ्रूण दुसऱ्या बालकाच्या शरीरात समाविष्ट होण्याच्या या दुर्मिळ प्रकारात, जन्माला येणाऱ्या सुमारे ५ लाख बालकांपैकी केवळ एकाच बालकात अशी स्थिती पाहायला मिळते.

विम्सच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. गड्डी दिवाकर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने अत्यंत जिकीरीची आणि सावधगिरीची शस्त्रक्रिया करून बालकाच्या पोटातून हा दुसरा भ्रूण यशस्वीरित्या बाहेर काढला. या यशस्वी उपचारामुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, डॉक्टरांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: