नारायणपूर जलाशयातून तेलंगणला पाणी सोडण्यात आल्याच्या आरोपावरून उत्तर कर्नाटकात नवा राजकीय वाद निर्माण झाला असून, कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय तोंडी सूचनेवरून पाणी सोडल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.
उत्तर कर्नाटकात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत नारायणपूर जलाशयातून तेलंगणला दोन टीएमसी पाणी सोडल्याचा आरोप समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणचे मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली होती. कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे पाणी सोडल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते अरविंद कुलकर्णी यांनी केला आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कृष्णा नदीच्या पाणीवापरावरून आता राजकीय संघर्ष पेटला असून, राज्य भाजपा अध्यक्षांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारला खूश करण्यासाठीच मूक संमतीने हे पाणी सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसऱ्या राज्याला पाणी देण्याचे औचित्य काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकात दुष्काळाचे सावट असताना तेलंगणला पाणी सोडल्याच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, यासंदर्भात सरकारने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सरकार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments