खानापूर येथील दहा वर्षांपूर्वीच्या २५ तोळे सोन्याच्या व्यवहारावरून निर्माण झालेला विवाद न सुटल्याने रुक्मणा झुंजवाडकर यांनी ५ ऑक्टोबरपासून दामले ज्वेलर्ससमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

वर्ष २०१६ मध्ये वैयक्तिक अडचणीमुळे रुक्मणा झुंजवाडकर यांनी सराफ व्यावसायिक केदार दामले यांच्याकडे २५ तोळे सोने गहाण ठेवून व्याजाने ५ लाख रुपये घेतले होते. एका महिन्यात व्याजासह सर्व रक्कम परत करूनही लॉकरचे कारण सांगत सोने परत केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी तालुक्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत अनेकदा बैठका झाल्या, मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही. आपले म्हणणे सत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी मंदिरात शपथ घेण्याचे आव्हान देत त्यांनी के. एस. दामले ज्वेलर्ससमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी केदार दामले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, कुटुंबाशी चर्चा करून प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, झुंजवाडकर यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून, काही अघटीत घडल्यास केदार दामले कुटुंब जबाबदार राहील अशी तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.


Recent Comments